धाराशिव (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यास गेलेल्या एकाचा सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चौकटीच्या फळीने डोक्यात मारल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यातील सहा आरोपींना दि. 6 मार्च रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोषींना प्रत्येकी पाच हजार रूपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती  अशी की, अबुतालिब फकीर उर्फ मकानदार, रियाज फकीर उर्फ मकानदार, फैयाज फकीर उर्फ मकानदार, जाकीर मुन्ना शेख, मुजम्मील उर्फ मुजूब गौसउद्दीन मुगळे, सर्व रा. दाळिंब, तौफीक महम्मद काझी रा. मुरुम  या सहाजनांनी पाशा रसूल पटेल यांना लहान मुलांच्या भांडणातून 

शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चौकटीच्या फळीने मारहान करुन जिवे ठार मारले.  त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. सं. कलम- 302, 143, 147, 148, 149, 323, 504 अन्वये मुरुम पोलीस ठाण्यात गुरनं.  177/2020 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.एम. जगताप, एस.एस. बिराजदार, पोलीस उप निरीक्षक, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जी.शेंडगे यांनी करुन जिल्हा व सत्र न्यायदंडाधिकारी उमरगा यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. के. अनभुले यांच्या न्यायालात 14 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा व साक्षीदारांची साक्ष आणि विशेष सरकारी वकील एस.एम देशपांडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


 
Top