धाराशिव (प्रतिनिधी)-शासकीय योजनांचा लाभ वंचित व शेवटच्या घटकातील सर्वसामान्य व्यक्तींना कसा देता येईल यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिले.

धाराशिव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये धाराशिव तहसील कार्यालयाच्यावतीने शासन आपल्या दारी, योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी या मोहिमे अंतर्गत भटक्या विमुक्त जाती, आदिवासी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड यासह विविध प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी धाराशिव तहसीलच्या तहसिलदार डॉ मृणाल जाधव, नायब तहसिलदार श्वेता घोटकर, निलेश काकडे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे, भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रा. लक्ष्मण सुपनार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जाधव म्हणाल्या की, महाराष्ट्र शासन राज्यातील प्रत्येक नागरिक विशेषतः गोरगरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना राबवीत आहे. त्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू, वंचित व शेवटच्या घटकातील व्यक्तींना मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी गाव, वाडी व वस्ती स्तरावर शासनाच्या सर्व योजनांची माहिती ग्रामसेवक, तलाठी यांच्या सह विविध यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या दारी हा अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत येत असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय आदी विभागातील अधिकारी कर्मचारी व पारधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
Top