भूम (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले. दि 18 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने लोकसभा निवडणुकीबाबत तहसिल कार्यालय पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात आदर्श आचारसंहितेची नियमावली बाबत माहिती दिली.
भूम परंडा वाशी व कळंब तालुक्यातील काही गावे या मतदार संघात येत असल्याने 372 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. तर 3 लाख 24 हजार मतदार असून 1 लाख 72 हजार पुरुष मतदार व 1 लाख 52 हजार महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदार 06 आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणुक विभागाकडून यंदा प्रथमच मोहिम हाती घेतली असून यासाठी स्विप कक्षाच्या माध्यमातुन मतदार संघात मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी यांची नियुव्ती करण्यात आली आहे. यावेळी भूम तहसिलदार जयवंत पाटील, परंडा तहसिलदार घनशाम आडसुळ, वाशी तहसिलदार राजेश नायब तहसिलदार गाडे, निवडणुक विभागाचे कर्मचारी आश्विनकुमार कांबळे, सतिष बोराळे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.