धाराशिव (प्रतिनिधी)-एसईबीसी आरक्षणामध्ये येणाऱ्या मराठा बांधवांना तात्काळ जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस भरतीमध्ये मराठा युवकांचे नुकसान टाळावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

मंगळवारी (दि.12) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या मराठा समाजाला दि. 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेऊन सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाजाकरिता एसईबीसी आरक्षण दिले आहे. परंतु सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीकरिता तसेच इतर सरकारी नोकर भरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांना जात प्रमाणपत्राअभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन मराठा समाजातील मागणी करणाऱ्या तरुणांना तात्काळ जात प्रमाणपत्र देऊन त्यांना होणारा त्रास व गैरसोय थांबवावी. तसेच त्यांचे वेळेअभावी होणारे नुकसान टाळावे, अन्यथा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना युवकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी दिला आहे.

निवेदनावर छावा विद्यार्थी आघाडीचे विक्रम जाधव, छावा वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवहरी भोसले, संघटक अमोल गोरे, नेताजी मुळे, प्रशांत जाधव, सुरज माने, करण कोरेकर, सुशील माने, सागर पटाडे, प्रसाद जाधव, राहुल सिरसट, संतोष जगताप, माने यांची स्वाक्षरी आहे.


 
Top