धाराशिव (प्रतिनिधी)-लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावगुंडानी काठीने मारहाण केल्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (गट-अ) संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.12) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून ओपीडीचे काम पाहिले. तसेच सदरील मारहाण करणाऱ्या गावगुंडास तात्काळ अटक करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जेवळी (ता.लोहारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 मार्च रोजी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावगुंडाने काठीने मारहाण केली. त्यामुळे सर्व कर्मचारी दहशतीखाली आहेत. सदरील गावगुंडाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीला आरोग्य सेवा संरक्षण कायदा 2009 नुसार अटक करुन कठोर शिक्षा करावी, महाराष्ट्र शासन निर्णय क्र. मवैअ-2013 नुसार तत्काळ जिल्हास्तरीय सुरक्षा समिती स्थापन करुन बैठक घेण्यात यावी, शासन शुद्धीपत्रक क्रमांक सुरक्षा-2022 नुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांत कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक तात्काळ नेमण्यात यावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, वर्ग 4 परिचर कर्मचारी देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (गट-अ) संघटनेचे धाराशिव शाखा अध्यक्ष डॉ. महेश गुरव, सचिव डॉ.रोहित राठोड, कार्याध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, उपाध्यक्ष डॉ. जहूर सय्यद, डॉ.अमोल शिनगारे, डॉ.सुहास पवार, राज्य प्रतिनिधी डॉ.सुशील चव्हाण, सहसचिव डॉ.अमरनाथ तांबडे, डॉ. राहुल जानराव, कोषाध्यक्ष डॉ.अमोल सूर्यवंशी, महिला सचिव डॉ.अश्विनी चौधरी, डॉ.रेखा टिके, डॉ.सीमा बळे, डॉ.पूजा चिंचोलीकर, डॉ.स्वप्नाली इंगळे, डॉ.महेश गिरी, डॉ.अजय माने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top