सोलापूर (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिनी कंबर तलाव जवळील रेल वनविहार येथे रेल्वे ऑफिसर्स, कर्मचारी तसेच सामाजिक संस्था यांनी मिळुन जवळपास 500 झाडांना 5000 लिटर पाणी देऊन त्यांचे संगोपन करण्यात आपला सहभाग नोंदवला. तसेच परिसरातील जवळपास 100 किलो कचरा गोळा करून आज परिसर स्वच्छ करण्यात आला. सर्वप्रथम श्री गजानन महाराजांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून त्यानिमित्ताने ही सर्व मंडळी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी न चुकता रेल्वे च्या वनविहार येथे एक बॉटल एक झाड या उपक्रमांतर्गत उपस्थिती नोंदवून झाडांचे संगोपन केले जात आहे जे स्तुत्य आहे.

याप्रसंगी शिवाजी कदम वरिष्ठ संरक्षा अधिकारी, रामलाल प्यासे वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनियर, श्री भगत सहाय्यक संरक्षा अधिकारी, पर्यावरण प्रेमी प्रवीण तळे, राजेश वडिशेरला, संत निरंकारी मंडळाचे सदस्य कोरे व अन्य सदस्य, जितेंद्र आर. वाघमारे, संजय उस्तुर्गे, श्री पाढी, श्री कोरे, श्री नागले व संरक्षा विभागाची संपुर्ण टिम, अशा जवळपास 50 लोकांनी आपले योगदान दिले. कदम यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणी कदम यांनी या प्रसंगी पर्यावरणाविषयी काव्यवाचन केले आणि झाडांचा सांभाळ करण्याचे आवाहन केले. 

तसेच श्री सुनील मोतेकर, पोलीस हवालदार, विजापूर नाका पोलीस स्टेशन यांचेकडून दररोज 500 लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येते. त्याच बरोबर यांचे कडून असामाजिक उपद्रवापासून संरक्षणासाठी ही मदत मिळत असते सर्वांचे श्री रामलाल प्यासे यांनी कौतुक केले व आभार मानले.


 
Top