तुळजापूर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास होणे गरजेचे आहे. सोशल मीडिया पासून दूर होऊन ग्रंथ वाचन केले तरच विद्यार्थ्यांची वैचारिक प्रगल्भता वाढीस लागेल असे प्रतिपादन तुळजापूर न. प. च्या मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांनी केले. 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर आधारित तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. 

व्याख्यानमालेस सुरूवात करताना डॉ. शिवाजीराव देशमुख म्हणाले की, ज्ञानशक्ती व कार्यशक्ती या दोहोंचा नि:स्वार्थ मेळ बापूजींनी घातला. सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी वसा घ्यावा लागतो. समाजासाठी तळमळ असणे गरजेचे असते, तो वसा व तळमळ बापूजींकडे होती. नाना पाटलांच्या पत्री सरकारात बापूजींनी पत्रके वाटण्याचे काम केले. स्वामी रामानंद यांनी सूचवले प्रमाणे संस्थेचे नाव श्री स्वामी विवेकानंद ठेवण्यात आले. यामध्ये सुध्दा एक वैचारिक भूमिका त्यांची दिसून येते. भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्या निर्माण होऊ नयेत ही दूरदृष्टी बापूजींकडे होती. शिक्षीत व्यक्ती लोकशाहीला सशक्त करू शकतो हे ठाम मत त्यांचे होते. 

अध्यक्षीय भाषण डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे झाले. तसेच सज्जन साळुंके यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मेजर डॉ. प्रोफेसर यशवंतराव डोके यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. धनंजय लोंढे यांनी केले. तर आभार डॉ. रामा रोकडे यांनी मानले. 



 
Top