धाराशिव (प्रतिनिधी)-लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी नागरिक निर्भय बनले पाहिजे. मोदी -शहा- फडवणीस हे खोटे आरोप करून विरोधकांचा आवाज दाबत आहेत. गुंड प्रवृत्तींना साथ देत आहेत. ते खुनशी, हिंसक प्रवृत्तीचे, जनतेच्या अमाप पैशाची उधळपट्टी करणारे, बेरोजगार व महागाईला प्रोत्साहन देणारे नेते आहेत. त्यामुळे मोदी शहा हे  देशाला अराजकतेकडे नेत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत  डॉ.विश्वंभर चौधरी व ॲड असीम सरोदे यांनी केले.

ते धाराशिव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात निर्भय बनोच्या सभेत बोलत होते. यावेळी डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले की लोकशाही व संविधान नागरिकांनी वाचवले पाहिजे.  मोदी हे खोटारडी संस्कृती आणून देशाला अराजकतेकडे नेत आहेत. गुजरातमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, तेथे शिक्षणाचे धींडवडे निघाले आहे. तेथे दारिद्य्रात वरचेवर वाढ होत आहे. भाजप लोकांवर ईडीची भीती दाखवून शिक्षा मात्र अत्यल्प प्रमाणात करत आहे. नोटाबंदी सुनियोजित भ्रष्टाचार होता. .

ॲॅड. असीम सरोदे म्हणाले की न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग व सीबीआयने स्वायत्तपणे काम केले पाहिजे. अरेरावीचा प्रसार संविधानाला मारक आहे.  माध्यमावर जाहिराती देऊन दबाव आणला जात आहे. बेरोजगारी महागाई दंगली याबद्दल मोदी न बोलता मंदिर व धर्मावर बोलत आहेत. मतदान करतेवेळी  ईव्हीएम मध्ये  दिनांक व वेळेची नोंद झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

प्रारंभी मान्यवरांनी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याला व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले. ॲड. श्रया आवले यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत नानासाहेब पाटील यांनी तर सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. या निर्भय सभेस विविध पक्ष, संघटना, संस्थाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी  उपस्थितांचे आभार रोहित बागल यांनी मानले. राष्ट्रगीताने सभेची, सांगता झाली.


 
Top