धाराशिव (प्रतिनिधी) - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या स्वरूपाच्या दर्शनी जाहिरात जिल्हा दैनिकांप्रमाणे साप्ताहिक वृत्तपत्रांना देण्यात याव्यात अशी मागणी व्हाइस ऑफ मीडियाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे दि.15 मार्च रोजी केली आहे.

 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.6, 7 व 8 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक वृत्तपत्रांना विकसित भारत व विकसित महाराष्ट्रच्या दर्शनी जाहिरात वितरित करण्यात आलेल्या आहेत. परंतू या जाहिराती वाटपात महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डावलण्यात आले आहे. विकासात्मक धोरणाच्या जाहिराती देताना सर्व वृत्तपत्रांना समान जाहिराती वाटप व्हायला पाहिजे, असे धोरण महाराष्ट्र शासनाने राबवावे. त्यामुळे लघु वृत्तपत्रांवर अन्याय होणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विकासाला वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना व्यापक प्रमाणात पोहोचवता येतील. त्यामुळे महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना या योजनांची जाहिरात देण्यात यावी. विशेष म्हणजे  साप्ताहिक हा शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचणारा दुवा म्हणून काम करीत आहे. तसेच शासकीय योजना, चांगुलपणाचे अनेक विषय साप्ताहिकच लोकांपर्यंत पोहोचवतात. मात्र त्याच साप्ताहिकांना डावलण्याचे काम सतत होत आहे. तर उत्तम बातम्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम हे साप्ताहिक आहे. त्याच पद्धतीने आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा निरोप साप्ताहिकवालेच उतम पद्धतीने करतात. त्यामुळे मागे झालेल्या अभियानात या जाहिराती देण्यात याव्यात. तसेच पुढच्या सर्व अभियान, उपक्रमाच्या जाहिरातीमध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांना डावलण्यात येऊ नये. हा एकच विषय नाही.तर यापूर्वीच्या अनेक विषयांमध्ये साप्ताहिकाला डावलण्याचे काम होते. त्यामुळे साप्ताहिकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी. तर आपण जाहिराती का दिल्या नाहीत ? यापुढे जाहिराती देणार तर कशा देणार ? याबाबत स्पष्टीकरण देणारे पत्र काढून न्याय द्यावा. जर तसे पत्र काढले नाही तर आम्हाला नाईलाजास्तव राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती कार्यालय व मंत्रालयासमोर उपोषण करावी लागेल असा इशारा दिला आहे. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, साप्ताहिकचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, कुंदन शिंदे, शितल वाघमारे, राजेश बिराजदार, जफरूद्दीन शेख, शाहरुख सय्यद, किरण कांबळे, मुस्तफा पठाण, शांतीलाल शहा, सलीम पठाण, शरद अडसूळ आदींच्या सह्या आहेत.


 
Top