धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा होताच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आचार संहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेवून 16 मार्च 2024 च्या दुपारी लोकसभा निवडणूक जाहीर केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलवली. पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घोष, अपर जिल्हाधिकारी शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव उपस्थित होते.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 40 मधील सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन करीत डॉ. ओम्बासे यांनी विविध विभागासाठी नोडल अधिकारी नेमले असून, काही अडचण असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या दोन विधानसभा मतदारसंघासह उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा, या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 20 लाख 4 हजार 288 आहे. तर मतदार केंद्राची संख्या 2 हजार 139 आहे. मतदार 7 मे 2024 रोजी होणार आहे. तर उमेदवारांना सुविधा पोर्टलद्वारे ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरू शकता. त्याप्रमाणे आचार संहिता भंगची तक्रार ऑनलाईन ही करू शकता. बैठे पथक, फिरते पथक आदी नेमण्यात आले असून, तक्रार आल्यापासून 15 ते 20 मिनिटात पथक संबंधित ठिकाणी पोहचेल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यंदा प्रथमच 18 ते 21 वयाचे 70 ते 85 हजार नवीन मतदार मतदान करणार आहेत. तर 85 वरील जेष्ठ नागरिक व अपंग यांना घरी थांबून मतदान करता येईल. परंतु त्यांनी चार पाच दिवस अगोदर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी निवडणूक काळात नाकाबंदी, चेकपोस्ट सुरू करणार आहे. त्याप्रमाणे काही गुन्हेगारांच्या बाबतीत हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला आहे. 


 
Top