तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संत रोहिदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मेजर डॉ. प्रोफेसर यशवंतराव डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. 

चर्मकार समाजात जन्म घेऊन समस्त मानव जातीला मानवतेची शिकवण दिली. अंधश्रद्धा म्हणजे कर्मकांड आणि जिथे कर्मकांड येतील तिथे जातियता येतेच म्हणून त्यांनी निर्गुण ईश्वराची संकल्पना मांडली त्यांच्या याच संकल्पनेवर प्रभावित होऊन संत मीराबाईंनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. 'मन चंगा तो कटौती में गंगा' त्यांनी हे बिरूद सुरू करुन मन पवित्र असेल तर आपले विचार देखील गंगे सारखे पवित्र राहील ही शिकवण त्यांनी विश्वाला दिली. मनाने पवित्र असणारा मानव हा मानवा - मानवातील भेद मानणार नाही अशी शिकवण त्यांनी दिली. माणूस धर्माने, जातीने आणि जन्माने श्रेष्ठ नसतो तर कर्माने श्रेष्ठ होतो हा त्यांचा पोषक विचार समाजाने आज अंगीकारणे काळाची गरज आहे असा अनमोल संदेश प्र. प्राचार्य डॉ. डोके यांनी यावेळी दिला. सदर प्रसंगी कार्यालयीन अधिक्षक सुमेर कांबळे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंत्री आर. आडे यांनी तर आभार प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी मानले.


 
Top