धाराशिव (प्रतिनिधी)-एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला धाराशिव जिल्हा फुटीनंतर मात्र खिळखिळा झाल्याचे जाणवत आहे. निष्ठावंताना परत एकदा ताकद देण्यासाठी उध्दव ठाकरे धाराशिव जिल्हा पिंजून काढत आहेत. 

धाराशिव जिल्ह्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे त्या काळात विशेष लक्ष होते. एक खासदार, चार आमदार अशा प्रमाणात जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून दिले होते. शिवसेनेच्या फुटीनंतर मात्र खासदार व एक आमदार अशी सध्याची स्थिती आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्हा ठाकरे यांच्या शिवसेनेला बख देणार का? हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटात गेले असले तरी म्हणावी अशी ताकद शिंदे गटाने जिल्ह्यात उभी केली नाही. धाराशिव जिल्ह्याला परत एकदा बालेकिल्ला बनविण्यासाठी उध्दव ठाकरे यांची शिवसेना प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत. खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा दांडगा संपर्क आणि आमदार कैलास पाटील यांचा मिळून मिळसून काम करण्याची हातोंटी यामुळे शिवसेनेचे सध्यातरी हे दोनच प्रमुख आधारस्तंभ असल्याचे मानले जात आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आजारी असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून सक्रीय नव्हते. परत एकदा ते सक्रीय झाल्यास जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरे धाराशिव जिल्हा पिंजून काढून निष्ठावंताना ताकद देत आहेत. 


 
Top