धाराशिव (प्रतिनिधी)- ट्रॅक्टरची चोरी केल्याच्या संशयावरून केलेल्या जबर मारहाणीत एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झालयाची घटना सोमवार दि. 18 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता सांजा गावात घडली. या प्रकरणी मृताची पत्नी सरिता अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

धाराशिव तालुक्यातील सांजा शिवारातून अंदाजे पाच लाख रूपयांचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर क्रं. एमएच 25 ए.सी. 8502 चोरी झाला होता. या प्रकरणी ट्रॅक्टर मालकासह इतरांनी ट्रॅक्टरचा शोध घेतला असता अशोक जनार्धन शिंदे व अजय झाडके हे ट्रॅक्टर नेत असल्याचे आढळून आले. दोघांनाही सांजा येथील तरूणांनी गावात आणून चाबूक, लाकडी काठीने, लोखंडी पाईपने मारहाण करत ठार केले. अशोक शिंदे यांचा मित्र अजय झाडके यांनाही जीवे मारण्याच्या उद्देशाने चाबूक, काठी, लोखंडी पाईपने मारहाण करत गंभीर जखमी केले. मृताची पत्नी सरिता अशोक शिंदे रा. खंडाळा सध्या रा. ज्ञानेश्वर नगर, धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुग्रीव किसन मेंढे, ज्ञानेश्वर अरूण मोरे, सचिन काशीनाथ यादव, सुजित नानासाहेब निंबाळकर सर्व रा. सांजा. राहुल अनिल साळुके रा. चिखली ता. जि. धाराशिव व इतर 20 अनोळखी जणांवर 302, 307, 326, 323, 147, 148,149 भा.द.वि.सं. अन्वये आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


 
Top