धाराशिव (प्रतिनिधी)-  सोलापूर - तुळजापूर -धाराशिव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रेल्वे प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे. शेतकरी, महसूल व रेल्वेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवून सर्वमान्य तोडगा काढावा,अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री.आनंद पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे  यांना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना 1 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेचा सदरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित व व्यवस्थित मावेजा मिळत नसल्याने ही प्रक्रिया रखडलेली आहे. राज्य शासनाने लवाद म्हणून जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे  यांना निर्देशित केलेले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणी जमिनी असून त्यांना बाजारभावापेक्षा अतिशय कमी दराने मोबदला दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून हळूहळू रेल्वेच्या भूसंपादनाला विरोध वाढत आहे जर असाच विरोध वाढत गेला तर रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकणार नाही परिणामी हा प्रकल्प अत्यंत संथ गतीने होईल.

हा रेल्वे मार्ग  वेळेत सुरू झाला नाही तर या प्रकल्पाचा नियोजित निधी बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे वर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी जिल्हाधिकारी यांनी शेतकरी, महसूल चे अधिकारी व रेल्वेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवून सर्वमान्य तोडगा काढावा.तसेच भूसंपादनाची प्रक्रिया शीघ्र गतीने पूर्ण करावी अशी मागणी जिल्हा परिषद  माजी सदस्य आनंद पाटील यांनी जिल्हाधिकारी  यांच्याकडे केली आहे.


 
Top