उमरगा (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षात महामार्ग क्रमांक 65 वर झालेल्या शेकडो प्रवाशांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे. असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी खासदारांना केला आहे. यावेळी त्यांनी महामार्गाच्या निकृष्ट कामासह एमआयडीसी, रेल्वे मार्ग, जिल्ह्यात न आलेले मोठे प्रकल्प किंवा उद्योग याविषयीही प्रश्न उपस्थित केला.

उमरगा येथे पत्रकार संवाद कार्यक्रमात उमरगा तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधताना सुरेश बिराजदार बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माधव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, साहेबराव पाटील, शमशोद्दीन जमादार आदी उपस्थित होते. या पत्रकार संवाद कार्यक्रमात पुढे बोलताना सुरेश बिराजदार म्हणाले की, सोलापूर- उमरगा- हुमनाबाद या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी खासदार म्हणून आपण कुठलीही भूमिका घेतलेली नाही. मागील सात ते आठ वर्षापासून आम्ही महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत आणि विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहोत. अशी स्थिती असतानाही आमच्या आंदोलनानंतर मागील वर्षी अचानक काम अर्धवट स्थितीत असल्याने खासदारांनी चार-पाच दिवस टोल बंदचा स्टंट करून पुन्हा लगेच कुठल्या आधारावर टोल चालू केला याचे गौडबंगाल काय आहे. अद्यापही या महामार्गाची अवस्था जैसे थे आहे आणि टोल वसुली जोमात सुरू आहे. या महामार्गावरती मागील पाच वर्षात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. मी प्रत्येकाचा फोन उचलतो असे सांगत फिरणाऱ्या खासदारांनी मागील पाच वर्षाच्या आपल्या कार्यकाळात अनेकांचे कुटुंब उध्वस्त करणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे का लक्ष दिले नाही? असा सवाल बिराजदार यांनी या पत्रकार परिषदेत विचारला आहे.


 
Top