धाराशिव  (प्रतिनिधी) - तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. या कारखान्यास गळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे बील दर 16 व्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. तर ऊस तोडणी ठेकेदार व मजुर, कर्मचारी यांचे पेमेंट देखील नियमितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम कारखाना सुरू केल्यापासून पहिल्या 16 व्या दिवसांपासून चालू केले आहे. ते बिल व पेमेंट देण्याचे सातत्य कायम ठेवून शेतकऱ्यांना भरोसा व विश्वास देण्याचे महत्त्वाचे काम करण्याबरोबरच इतर कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.1 मार्च रोजी केले.

तालुक्यातील जागजी शिवारामध्ये असलेल्या एनव्हीपी शुगर प्रा. लि., या कारखान्याने आजपर्यंत 1 लाख 1 टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यापासून 30 किलो वजनाच्या 4 लाख 91 हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष बालाजी पाटील, सी.ए. सचिन शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, राजाभाऊ देशमुख, अक्षय पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल लोमटे, चिफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, मे.चिफ केमिस्ट बिक्कड, पॅन इन्चार्ज राजेंद्र शिंदे, नरसिंह मोरे, समाधान शिंदे आदी उपस्थित होते. 


शेतकऱ्यांचे सहकार्य

28 ऑक्टोबर 2023 पासून कारखान्याचे गाळप सुरू केले असून आजपर्यंत 1 लाख 2 टन उसाचे गाळप या कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्यास गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल 16 व्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. पहिल्यापासून शेतकऱ्यांना प्राधान्य दिले असून उसास 2 हजार 800 रुपये दर दिला असून शेतकऱ्यांनी देखील या कारखान्यास ऊस देऊन चांगले सहकार्य केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन बालाजी पाटील यांनी सांगितले. 


 
Top