धाराशिव (प्रतिनिधी)- आकाशवाणी धाराशिव हे Local Radio Station (LRS) योजने अंतर्गत सन 1996 ला सुरुवात झालेले केंद्र आहे. या केंद्राला मागील 27 वर्षात अनेक गुणवत्ता पुरस्कार मिळाले असून, राज्यातील इतर काही आकाशवाणी केंद्राच्या तुलनेत आकाशवाणी धाराशिवने जाहिरातीव्दारे सरकारला मोठया प्रमाणात महसुल ही दिलेला आहे. परंतू मागील दोन वर्षापासून सायंकाळच्या सभेत मराठी भाषेतील स्थानिक कार्यक्रमांचे प्रसारण बंद करून मुंबईचे हिंदी भाषेतील कार्यक्रम लादल्या मुळे श्रोत्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. शिवाय स्थानिक कलावंत, गुणवंत विद्यार्थी, महिला युवक- युवती, जाहिरातदार यांना हक्काच्या व्यासपिठापासून वंचीत रहावे लागल होते. श्रोत्यांची आणि मराठी भाषेची झालेली ही गळचेपी लक्षात घेता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठी भाषा गौरव दिनी अर्थात 27 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथील आकाशवाणीच्या पश्चीम विभागाचे महानिदेशक कंबलियाल यांची भेट घेवून धाराशिव आकाशवाणी केंद्राच्या सायंकाळच्या प्रसारण सभेत सर्व स्थानिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची सुचना केली. त्यांच्या या  पाठपुराव्यामुळे दि. 01 मार्च 2024 पासून आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या सायंकाळच्या प्रसारण सभेत मराठी भाषेतील स्थानिक कार्यक्रम  सुरु झाले आहेत. यामुळे गावोगावी असणाऱ्या भजनी मंडळ, आराधी मंडळ, भिमगीते, धनगरी ओव्या भारुड यासारख्या लोकसंगीत कलाप्रकारांना आणि कलाकरांना, तसेच गुणवंतना  पुन्हा एकदा हक्काच शासकीय व्यासपिठ उपलब्ध  झाले आहे.


 
Top