धाराशिव (प्रतिनिधी)- अपवादात्मक समर्पण आणि उत्कृष्ट नेतृत्वाची दखल घेऊन अभियंत्रिकी महाविद्यालय धाराशिव चे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांना धाराशिव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित द्वारे सन्मानित करण्यात आले.
हा प्रतिष्ठित पुरस्कार डॉ. माने यांचे प्रशासनातील अतुलनीय योगदान तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता वाढवण्याची त्यांची अटिल बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. गेल्या 25 वर्षापासून डॉ. माने हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध प्रबंध सादर केलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. हा पुरस्कार प्रदान करताना शिक्षकांचे राज्य नेते व अल्पसंख्यांक पतसंस्थेचे चेअरमन बशीर तांबोळी, व्हाईस चेअरमन मालोजी वाघमारे,संचालक मारुती काळे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब चिवडे, तंत्रस्नेही शिक्षक नागेश बोडके तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.शितल पवार, रामेश्वर मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. माने यांच्या या यशाबद्दल तसेच त्यांच्या कार्याची दखल घेतल्यामुळे त्यांचा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील,सर्व विश्वस्त तसेच आमदार राणाजगजीतसिंह पाटील, मल्हार पाटील, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.