उमरगा (प्रतिनिधी)-  तालुक्यातील तुरोरी येथे जगत्‌‍ गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजोत्सोवानिमित्त मंगळवार (दि.19) ते बुधवार (दि.27) दरम्यान नामवंत किर्तनकारांचे किर्तन, प्रवचन, धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर गुरूवारी (दि.28) जंगी कुस्त्यांनी सदरील बिजोत्सवाची सांगता करण्यात आली.

उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे मोठया प्रमाणावर बिजोत्पादन साजरा केला जातो. तुकाराम महाराज बीजोत्सोवाचे हे 158 वे वर्ष होते. देहू नंतर तुरोरी येथे जगद्बीगुरु बिजोत्सवाची भव्य दिव्यता पहाण्यास मिळते. दुपारी अडीच वाजता अचलबेट देवस्थान येथे अवधूत पुरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या नंतर येथेही महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच शेवटची कुस्ती डॉ विजयकुमार जाधव यांच्या वतीने पाच हजार रुपयांची ठेवण्यात आली होती. पाच वाजता राष्ट्रीय महामार्गा शेजारी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिवसह लातूर, सोलापूर, कर्नाटकातील बीदर व कलबुर्गी जिल्ह्यातील पैलवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नारळापासून  2 हजार, 3 हजार रूपयांच्या जवळपास दिडशे कुस्त्या झाल्यानंतर शेवटची कुस्ती धाराशिव व सोलापूर येथील दोन पैलवानात लावण्यात आली. यात सोलापूर येथील रविराज सरवदे या पैलवानाने विजय संपादन केला. विजेत्या मल्लाला वाजत गाजत मिरवणुकीने गावातील हनुमान मंदिरात आणल्यानंतर समितीचे प्रमुख उपसरपंच तुकाराम जाधव यांनी सत्कार करून रोख बक्षीस दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोकराव जाधव कारभारी, माजी सदस्य संजय जाधव, माजी उपसरपंच पंडित शिंदे, तुकाराम गायकवाड, शिवसेनेचे गटप्रमुख विजयकुमार भोसले आदिंची उपस्थिती होती. 


 
Top