धाराशिव (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांचे निवडणूक लढवणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्पलेटस्‌‍, कटआउटस, होर्डिंग्ज, कमानी लावण्यामुळ रहदारीस अडथळा, अपघाताच्या शक्यतेमुळे 6 जूनपर्यंत जिल्ह्यात निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

कार्यालये, विश्रामगृह येथे मिरवणूक, मोर्चा, आंदोलन, निदर्शने, उपोषण, घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा निवडणूक प्रचार करण्यावरही निर्बंध लावले आहेत. निवडणूक प्रचारासाठी खासगी व्यक्ती, सार्वजनिक जागेवर झेंडे व भित्तीपत्रके लावण्यास बंदी असून, झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे आदीकरिता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार किंवा भिंतीवर संबंधित मालकाच्या परवानगीशिवाय वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

निवडणूक पत्रकाच्या व भित्ती पत्रकांच्या छपाईबाबत निर्बंध घाले आहेत. मुद्रांकाचे छपाई काम करणाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. कोणीही मुद्रांक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र करून दिल्याशिवाय लोकसभा निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्षांकरिता छपाई करून देतील, अशाविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रूग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर बंदी आहे. याशिवाय जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिराचे वा मेळाव्याचे आयोजन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (6 जून) निर्बंध घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जाहीर केले आहे.  


 
Top