धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम सोमवारी दि.11 सायंकाळी शानदार सोहळ्यात पार पडला. या कार्यक्रमाचे शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर, अभिनेत्री सोनाली पाटील, भारगवी चिरमुले व सुरबी हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. धाराशिव शहरासह परिसरातील महिलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून मनसोक्त आणि मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे हा देखणा कार्यक्रम आयोजित करून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सावंत यांचे महिलांनी तोंडभरून कौतूक केले. यापुढेही महिलांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सांवत यांनी दिली. प्रथम विजेत्या महिलेस एक स्कुटी, इतर महिलांना 301 पैठणी साड्या, 31 मिक्सर, डबलडोर फ्रीज, स्मार्ट टिव्हीसह, वॉशिंग मशीनचे वितरणही  सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस 15 मार्च रोजी आहे. महिला कुटुंबाचा कणा आहे. आपला संसार संभाळताना त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरात यापुढेही अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे  शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, मागासवर्गीय शिवसेना जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश जगताप आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top