धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षण, आरोग्य,महिला व बालकांचे कल्याण तसेच दिव्यांगाचे कल्याण यावर भर देणारे जिल्हा परिषद धाराशिवचे सन 2024 - 25 या आर्थिक वर्षाचे 24 कोटी 49 लक्ष रुपये खर्चाचे स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक शुक्रवारी 7 मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. मैनाक घोष यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर केले.

जिल्हा परिषद स्वउत्पन्न व पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती निधीचे तसेच पंचायत समितीच्या स्वनिधीच्या सन 2023-24 या वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकास व सन 2024-25 च्या मुळ अंदाजपत्रकास या सभेत मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषद इमारतीमध्ये सौर विद्युतीकरण करणे,जिल्हा परिषदेच्या इमारतीवरील पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे परिसरामध्ये पुनर्भरण करणे, जननी सखी योजना, बायोमेडीकल वेस्टसाठी तरतुद, जिल्हयातील दिव्यांग व्यक्तीचे सर्व्हेक्षण करणे,जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळामध्ये वाचनालय/ग्रंथालय तयार करणे,अतितीव्र कुपोषित बालकमुक्त ग्रामपंचायतींना दरवर्षी बक्षिस देणे, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वीत करणे इत्यादी अभिनव/नाविण्यपुर्ण संकल्पनासाठी या अंदाजपत्रकामध्ये भरीव तरतुद करण्यात आली आहे.

तसेच प्राथमिक शाळाची देखभाल व दुरुस्ती,राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानातंर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुर्नबांधणी,दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना अर्थसहाय्य,अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना अर्थसहाय्य देणे,इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे, लंम्पी त्वचा आजार, 5 वी ते 12 वीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करणे,शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी पुरवठा करणे, मार्ग व पुल दुरुस्ती,लघु पाटबंधारे दुरुस्ती आदी योजनावर देखील भर देण्यात आला आहे.

हा अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. मैनक घोष यांचेकडे सुपूर्द केला.त्यानंतर डॉ.घोष यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर मांडला व त्यास मंजुरी प्रदान केली.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  सुर्यकांत भुजबळ,उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत मोरे, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं), श्याम गोडभरले,कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) देवदत्त गिरी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) सरवदे, कृषी विकास अधिकारी, प्रमोद राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख आदी विभाग प्रमुख तसेच वित्त विभागाचे लेखा अधिकारी, चंद्रशेखर काजळे, कर्मचारी शरद माळी,जयप्रकाश हिरोळे, गोपाळ पांचाळ,कमलाकर धोंगडे, राहुल थापडे, प्रवीण सुर्यवंशी, किशोर ढेंगळे उपस्थित होते.


 
Top