धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील खिरणी मळा येथील अवैध कत्तलखान्यावर धाराशिव शहर पोलिसांनी अचानक छापा मारला. यात 2825 किलो गोवंशीय जनावरांचे मांस व सहा जनावरे आढळली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

खिरणी मळा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पदरित्या अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्या अधारे पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी तेथे आकिब महेमुद कुरेशी, अहमद अकबर कुरेशी आढळून आले. पत्र्याच्या शेड जवळच उभा असलेला आयशर टेम्पो क्रमांक एमएच 42 एक्यु 8668 व छोटा टेम्पो क्र. एमएच 03, सीव्ही 2130 अशी दोन वाहने दिसून आली. या पिकअमध्ये सहा गोवंशीय जनावरे आढळून आल्याने पोलिसांनी नमूद दोघांना माहिती विचारली. त्यांनी सदरचा कत्तलखाना हा बुढान कुरेशी, अमिन कुरेशी, जलील कुरेशी, बाबा कुरेशी यांचा असल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून जनावरे कापून मांस आयशर टेम्पोमध्ये भरून हैदराबादला पाठवत असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी अंदाजे चार लाख 23 हजार 750 रूपयांचे गोवंशीय मांस, दोन वाहने, एक मोबाईल, लोखंडी सुरा असा एकूण 19 लाख 13 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस अंमलदार राम कनामे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद सहा जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


 
Top