धाराशिव (प्रतिनिधी)-दरोड्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली असून, पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली आहे. हा प्रकार कळंब तालुक्यातील पानगाव येथील एका वस्तीवर घडला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पोलीस पथक बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमरास कळंब रोडवरील हॉटेल रॉयलसमोर पानगाव वस्ती येथे येरमाळा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेले होते.

येरमाळा पोलीस ठाण्यात गुरनं 12/2023 कलम 395, 506 मधील आरोपी दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार यांना हे पोलिस पथक ताब्यात घेणार असतानाच आरोपी दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार यांच्यासह अन्य 10 ते 15 लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून आरडाओरड करुन रोड अडवून पोलीस पथकावर दगडफेक केली. पोलिस पथकातील अधिकारी जीव वाचवत असताना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्यात आली. तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी गुन्हेशाखेचे पोलीस अंमलदार बबन जाधवर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम तक्रारीवरुन भा.दं.वि.सं. कलम- 308, 353, 224, 225, 294, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम 8(ब) सह 135 मपोका अन्वये येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top