धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून जागजी शिवारात सुरु करण्यात आलेल्या एनव्हीपी शुगरने चाचणी गळीत हंगामात फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत 1 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. आजपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे प्रति मे.टन 2800 रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली.

1 लाख मे.टन ऊस गाळपानंतर एनव्हीपी शुगरमध्ये गुळ पोत्यांच्या पूजनाचा कार्यक्रम धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाशदादा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.1) पार पडला. यावेळी बोलताना खा.राजेनिंबाळकर म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून मोळीपूजन कार्यक्रमामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे पंधरवडा संपल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा करण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस एनव्हीपी शुगरला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

शेतकऱ्यांच्या खात्यात 2800 रुपयेप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली असून पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिवच्या शाखेत जाऊन आपले बिल घ्यावे. असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी यावेळी केले.

गुळपोत्यांच्या पूजन सोहळ्यास आप्पासाहेब पाटील, सी.ए. सचिन शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, राजाभाऊ देशमुख, अक्षय पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल लोमटे, चीफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चीफ केमिस्ट बिक्कड, पॅन इंचार्ज राजेंद्र शिंदे, नरसिंह मोरे, समाधान शिंदे यांच्यासह जागजी गावातील परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top