तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जळकोट  येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी नुकत्याच संपन्न झालेल्या मकर संक्रांति सणाच्या निमित्ताने गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच आशोक पाटील, उपसरपंच प्रशांत नवगिरे व मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात गावातील दीड ते दोन हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात सुनीता पाटील, अश्विनी नवगिरे, दीपा कदम, सुलभा कदम, श्रीदेवी कवठे, सुरेखा माळगे, राजश्री कागे, जयश्री भोगे, अलका हिंडोळे, संगीता साखरे, महानंदा कुंभार यांनी, कार्यक्रमास उपस्थित गावातील सर्व महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे भैरवनाथ कानडे यांनी महिलांना उखाणे घ्यायला लावून विविध प्रकारे मनोरंजन केले. तसेच याच सोहळ्यात “स्वरराणी“या मराठी भक्ती गीते, भावगीते व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता . गायिका वर्षाराणी कुदळे यांनी आपल्या मधुर गायनाने उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले व कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारे भैरवनाथ कानडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतीज्योती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आशोक पाटील यांनी केला.

या दिमाखदार सोहळ्याचे कौतुक करून कांही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच आशोक पाटील, उपसरपंच प्रशांत नवगिरे, ग्रा.पं. सदस्य गजेंद्र कदम, जीवन कुंभार, नामदेव कागे, बसवराज कवठे, कल्याणी साखरे, अंकुश लोखंडे यांच्यासह महेश कदम, श्रीनिवास पाटील, शिवराम कदम आदींनी परिश्रम घेतले.


 
Top