उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील पेठसांगवी गावात मागील एक महिन्यापासून पाण्याचा दुष्काळ पडला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणती ही उपाययोजना करण्यात आलेली नाही. वापरण्याचे पाण्यासाठी 5 रुपयात घागरभर तर पिण्याच्या पाण्याची घागरभर पाण्यासाठी 10 रुपये मोजावे लागत आहेत. ज्यांच्याकडे साठवणूकीची व्यवस्था आहे त्यांना एक टँकर पाण्यासाठी दिड हजार रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामपंचायतने तीन अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. परंतु प्रशासनाने मात्र आवश्यक उपाययोजना न केल्याने नागरीकांना मात्र घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

पेठसांगवी येथे गेले एक महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईत जाणू लागल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी राणोमाळ भटकंती करावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत बंद पडल्याने गावकऱ्यांना बैलगाडीद्वारे अथवा दुचाकीवर, टमटम किंवा चार चाकी वाहनाद्वारे पाण्यासाठी पाण्याचा शोध घेऊन मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे. पाण्याअभावी जनावरांच्या अतोनात हाल चालू आहे. वास्तविक गावात दोन बोर, एक विहीर दोन्ही असूनही तेथे पाणी नसत्याने विहीर कोरडी  टाक आहे. बोअरवेल पाणी कमी झाल्याने बोरच्या पाणीपुरवठा होत नाही आणि गावामध्ये हातपंप चार असून तेथील तीन हातपंप बंद आहेत. 1993 च्या भूकंपानंतर पेठसांगवी, पेठसांगवीची वाडी व माळ या तीन भागात पुनर्वसन झाले. गावात सन 1998 ला 22 खेडी पाणीपुरवठा योजना राबविली होती. ही योजना अल्पावधीत निकामी झाल्यामुळे नागरिकांना 22 महिने देखील पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी वारंवार पाठपुरावा केल्याने शासनाने यासाठी 97 लाख रूपयाची मंजुरी दिली होती. परंतु सरकार कडून ऐनवेळी स्थगिती देण्यात आली. एक हजार पन्नास कुटुंबातील पाच हजार लोकसंख्या तर तीन हजाराच्या जवळपास लहान मोठी दुभती जनावरे आहेत. मागील एक महिन्यापासून ग्रामपंचायतींचे पाच कूपनलिका बंद पडल्या आहेत. गाव तीन ठिकाणी बसले असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. जुन्या गावातील पाणी पुरवठा होणारी कूपनलिका व एक विहीर सध्या बंद अवस्थेत असल्याने गावातील नागरिक रात्रदिवस पाण्यासाठी भटकंती करत आहेत. ग्रामपंचायतने तीन विंधनविहीरी अधिग्रहण करण्याची मागणी पंचायत समितीकडे कळवली आहे परंतु तो प्रस्ताव अदयाप लालफितीत अडकला आहे. परिणामी गावात पाणी मिळत नसल्याने नागरिक टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. पाच रुपये घागर वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी दहा रुपयाला एक घागर पाणी विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. 


पेठसांगवी गावची लोकसंख्या सहा हजार आहे. 1993 च्या महाप्रलयकारी भूकंपानंतर गावचे पुनर्वसन माळरान वस्तीवर खडकाळ भागात झाले आहे. पुनर्वसन झालेल्या ठिकाणी कुठलाही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसून जुन्या गावामधून ग्रामपंचायतीच्या विहिरीमधून व तसेच दोन-तीन बोरवेल मधून पाणीपुरवठा होत होते. परंतु पावसाळा कमी झाल्याने पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे बंद झाले आहे. शासनाने बोअर विहीर अधिग्रहण करुन किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा लवकरात लवकर करावे अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

- महेश देशमुख चेअरमन महाराष्ट्र युवक काँग्रेस क्रिडा समिती.


 
Top