उमरगा (प्रतिनिधी)-शहरातील मुख्य रस्त्यालगत श्रीराम मंगल कार्यालयाशेजारी असलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरने फोडले. आतील 94 हजार 400 रुपयेपैकी जळालेल्या नोटा ठेवून उर्वरीत रक्कम घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात बलसूर येथे ही एसटीएम फोडण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे उमरगा तालुक्यात एटीएम मशीन फोडण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत श्रीराम मंगल कार्यालया शेजारी आसलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. रविवारी पहाटे चारचाकी गाडी एटीएमच्या समोर लाऊन एटीएम समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळ्या रंगाचे स्प्रे मारला. त्यानंतर मशीन असलेल्या रुममध्ये प्रवेश केला. आजुबाजुला कोणीही नसल्याची खात्री करत चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन मधील कॅश वॉल्ट कट केले. एटीएम मशीनमधील चार ट्रेमधील 94 हजार 400 रुपये होते. यापैकी एटीएम मशीन कटरने कट करताना जळालेल्या नोटा ठेवून उर्वरीत नोटा घेऊन चोरटा फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सायंकाळी बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी ठसे तज्ञांचे पथकही दाखल झाले होते. आठ दिवसात उमरगा ठाण्याच्या हद्दीत दोन एटीएम फोडल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.


उमरगा येथे उपविभागीय अधिकारी अधिकारी म्हणून सदाशिव शेलार हे शनिवारी (दि.4) रुजू होताच 24 तासांच्या आत चोरटयांनी त्यांना सलामी दिली आहे. चार दिवसांपूर्वी उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून आठ लाखांची रोकड लंपास केली होती. पोलिसांना या घटनेतील अद्याप कसलाही सुगावा लागला नसताना उमरगा शहरातील एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी पोलासांना आव्हान दिले आहे.


 
Top