भूम (प्रतिनिधी)-ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजना विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी  भुम येथील जलरथास तहसीलदार जयवंत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. 

भुम येथील तहसील कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी जैन संघटनेचे ज्येष्ठ नेते शीतलभाई शहा तालुका अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल उपस्थित होते. ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून  राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज सकाळी जिल्ह्यातील 8 तालुक्यात जल रथांद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या 8 रथांवर सनियंत्रणासाठी जिल्हा कक्षावर नोडल अधिकारी म्हणून जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक, तालुका पातळीवर गट विकास अधिकारी तसेच शासन नियुक्त प्रतिनिधी जिल्हा व तालुका पातळीवर रथाचे नियोजन करणार आहेत.

 गावा-गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स, गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत तसेच नियुक्त केलेल्या समन्वयका मार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल. 

भारतीय जैन संघटना या कार्यासाठी तंत्रज्ञानाची मदत व डिमांड जनरेशनसाठी गावो गावी जाऊन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचून जनजागृती करणार आहे. तरी या योजनेचा लाभ जास्तीत -जास्त शेतकऱ्यानी व ग्रामपंचायतीने घेवून तालुका दुष्काळ मुक्त करण्यासाठी तालुका अध्यक्ष सुनील कूमार डुंगरवाल यांनी आवाहन केले आहे.


 
Top