धाराशिव (प्रतिनिधी)-अथक परिश्रमातून यशाचे शिखर नक्कीच गाठता येते,विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य ठेवले पाहिजे असे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलताना उद्गार काढले.
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दि.09 फेब्रुवारी 2024 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लोक सांगतात म्हणून अभ्यास न करता स्वतः आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झोकून देऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना संकल्पना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अथक परिश्रमातून आपणाला नक्कीच यशाचे शिखर गाठता येते असे ते म्हणाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व येणाऱ्या बोर्डाच्या आणि विद्यापीठाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचेही भाषण झाले.
याप्रसंगी परीक्षा विभागात गुणानुक्रमे आलेल्या अकरावी बारावी बी.ए., बी.एस्सी, बी.कॉम, एम.ए. एम एस्सी, एम.कॉम व राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना, यामध्ये विशेष प्राविण्य मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शिवाजी गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.वैभव आगळे यांनी केले. तर आभार प्रा. अजिंक्य रेनके यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.