धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून जीपॅट ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतन (स्टायपेंड) देणे अचानकपणे बंद केले आहे. त्यामुळे अनेक होतकरू व गरजु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. पदव्युत्तर फार्मसीचा रिसर्च प्रोजेक्ट आणि इतर  शैक्षणिक खर्च मोठा असतो. तो सर्वांना पेलला जात नाही. अशातच सरकारने हे विद्यावेतन अचानकपणे बंद केल्याने फार्मसी विद्यार्थी अडचणीत आले आहेत. त्यामुळे जीपॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले.

या आंदोलनाचे राज्य समन्वयक प्रदेश सरचिटणीस प्रा.अमोल पाटील यांच्या माध्यमातुन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या स्वरुपात फार्मसी विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धाराशिव मध्ये देखील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद पवार) गटाकडून आम्ही सर्व सहकारी मिळून धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांनी दिली.


 
Top