धाराशिव (प्रतिनिधी)-कृषी, पर्यटन, दळणवळणासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे. शाश्वत विकासाचा रोडमॅप दाखविणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारत या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरकडे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा अंतर्भाव या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना अपेक्षित न्याय देण्याचा प्रयत्न अत्यंत सजगपणे केला गेला आहे. निराधार व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ आणि आगामी काळात कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेल्या ड्रोन मिशनला मान्यता या महत्वाच्या बाबी या अर्थसंकल्पात घेण्यात आल्या आहेत. पर्यटन वाढीबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेतून सात हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप अशा महत्वपूर्ण योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका यांच्या स्मारकासाठी जमीन व निधी त्याचबरोबर अयोध्या व श्रीनगर येथे पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा ध्यानात घेवून महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून 50 हजार नवीन रोजगार निर्मितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. राज्यात दोन हजार ठिकाणी नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे विकसित केली जाणार आहेत. त्यातून तरूणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. या अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


 
Top