भूम (प्रतिनिधी)-मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दि.14 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने 'महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी भूम शहर व तालुक्यामध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

शहर व तालुक्यातील व्यापारी व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवत या बंदमध्ये सहभाग नोंदवला. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील बंदची हाक दिल्याने ग्रामीण भागात देखील हा बंद कडकडीत पाळण्यात आला. शहरात दुपारपर्यंत शांत असलेले वातावरण नारायण राणे यांच्या वक्तव्याने ढवळून निघाले. भूम शहरातील गोलाई चौकात तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देऊन सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सदरील घटना दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान घडली. याव्यतिरिक्त तालुक्यातील इतर ठिकाणी शांततेत बंद पार पडला. भूम बसस्थानकातून एस.टी.ची वाहतूक सेवा देखील दिवसभर सुरळीत सुरू होती. भूम शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सामील होत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवली. त्यामुळे बंदला भूम शहर तसेच ग्रामीण भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


 
Top