धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) यांच्या माध्यमातून उद्या दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी कौडगाव ता. धाराशिव येथील प्रस्तावित टेक्निकल टेक्सटाइल पार्कच्या अनुषंगाने उद्योजकांसाठी स्थळ पाहणी व गोलमेज बैठक (Roundtable Discussion) आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. सदरील चर्चेसाठी 10 हून अधिक नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधीसह केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय व एमआयडीसी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्य सरकारने धाराशिव ला महाराष्ट्रातील तांत्रिक वस्त्रोद्योगाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असून राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग आणि औद्योगिक धोरणांतर्गत येथे उद्योग उभारल्यास उद्योजकांना जास्तीत जास्त लाभ तर मिळतोच, परंतु भौगोलिक दृष्ट्या देखील याचे अनेक फायदे आहेत. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, पाणी यासह पुणे व नाशिक येथील आगामी मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क मुळे दळणवळण व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथील उद्योजकांना वीज, पाणी आणि इतर आवश्यक सोयी सुविधा सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने नुकतेच एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण जारी केले असून यामध्ये 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 5 लाख लोकांना रोजगार निर्मितीचे उदिष्ट ठेवले आहे.

कौडगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 3 मध्ये 90.20 हेक्टर क्षेत्रावर टेक्निकल टेक्सटाईल पार्क प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मुख्य अभियंता एमआयडीसी यांच्याकडून या पार्कच्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पुल, पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन, विद्युतीकरण व वृक्षारोपण या कामांकरिता रुपये 111.40 कोटी अंदाजपत्रकीय किमतीच्या कामांचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे.

भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात झपाट्याने वाढत असून जीडीपी मध्ये सुमारे 0.7% योगदान आहे. तर बाजारपेठेतील अंदाजे 13% वाटा आहे. या वस्त्रांची जगभरातील मागणी वाढत असून या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल्स मिशन (NTTM) योजनेसह उत्पादनावर आधारित प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे.

सदरील कार्यक्रमास केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त सुश्री रूप राशी, मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, सचिव (वस्त्र) श्री वीरेंद्र सिंग, विकास आयुक्त डॉ. दीपेंद्र कुशवाह, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


 
Top