धाराशिव (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे शिव राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने राज्यस्तरीय भजनी मंडळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातील 42 भजनी मंडळाचे संघ सहभागी झाले होते. अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने धाराशिव शहरातील बार्शी नाका जिजाऊ चौक भागातील स्वयंवर मंगल कार्यालयात भजनी मंडळाचे अनेक टाळकरी वारकरी मोठ्या सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन विद्याभारतीचे कमलाकर वामनराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे, उपाध्यक्ष गौरव बागल, सचिव आकाश कोकाटे, ॲड. रवींद्र कदम, सतीश कोळगे, ॲड. गजानन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. भागवत धर्माची पताका फडकवणाऱ्या हिंदू धर्माचा भजनी मंडळाचा उपक्रम वाढत जावा आणि सर्वसामान्य नागरिकांना भजनाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ही भजनी मंडळी स्पर्धा घेण्यात आली होती. अतिशय अटीतटीच्या पध्दतीने संपन्न झालेल्या या भजनी मंडळ स्पर्धेचे परीक्षण धाराशिव शहरातील भारत महाराज कोकाटे, ॲड. गजानन चौगुले, ॲड. पांडुरंग महाराज लोमटे, आनंद महाराज बानकर, लक्ष्मण महाराज जगताप यांनी तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने केले. या स्पर्धेत धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील आनंदा आश्रम भजनी मंडळाने 21 हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले. तर 11 हजार रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील उदयगिरी भजनी मंडळाने पटकावले. तृतीय पुरस्काराचा मानकरी धाराशिव तालुक्यातील अनसुर्डा येथील जय हनुमान भजनी मंडळ संघ 5100/-रुपये देऊन गौरवण्यात आले अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय भजनी मंडळ स्पर्धेमुळे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा यावर्षी एक वेगळा उपक्रम यानिमित्ताने नोंदवला गेला.


 
Top