धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सराटी येथे आमरण उपोषण चालू केले आहे. या उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार कोणतेही लक्ष जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे देत नाही. त्याच्या निषेधार्थ धाराशिव शहरात गुरूवार दि. 15 फेब्रुवारी रोजी शहर बंद करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक व जिजाऊ चौक हे दोन्ही चौक टॅक्टर, बैलगाडी आडवी लावून रस्ता रोको करण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशीही बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही युवकांनी बेदमुत शहर बंदची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे.

14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होतो. मनोज जरांगे पाटील यांची नाकातून रक्त आल्यामुळे व जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिल्यामुळे समाजात तणावाचे वातावरण पसरले आहे. सरकारने यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते ते पाळले का जात नाहीत. त्यामुळेच जरांगे पाटील यांना परत एकदा उपोषणास बसावे लागले. सहा दिवस होवू देखील सरकार जरांगे पाटील यांच्या तब्यतेकडे लक्ष देत नाही. त्यांच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक व जिजाऊ चौक येथे टॅक्टर, बैल गाड्या आडव्या लावून रास्तारोको करण्यात आला. तर काही युवकांनी शहरात फिरून सलग दुसऱ्यादिवशीही बाजारपेठ बंद केली. त्यामुळे शहरात एकंदर तणावाचे वातावरण पसरले आहे. 


बेमुदत शहर बंदची घोषणा

धाराशिव शहराच्या सांजा व इतर ग्रामीण भागातून बैंलगाड्या, ट्रॅक्टर, मोटारसायकल घेवून सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व जिजाऊ चौक येथे रास्ता रोको करण्यात आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात चारी बाजूने बैलगाड्या लागून शहर बंद करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाण मांडून बसलेल्या सकल मराठा समाजाने खिचडी करून जेवण ही केले. त्यानंतर त्यांनी जोपर्यंत सरकार जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही, मराठा आरक्षण मान्य करत नाही तोपर्यंत धाराशिव शहर बेमुदत बंद करण्याची घोषणा यावेळी केली. 


जमाव बंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

जिल्हा प्रशासनाच्यावतीने धाराशिव जिल्ह्यात सतत होणारे मोर्चे, बंद, संप, रास्ता रोको, आंदोलनात्मक कार्यक्रम याला आळा घालण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रोहिदास महाराज जयंती, मुस्लिम समाजाचा शब-ए-बारात सण, चिवरी येथील महालक्ष्मीची यात्रा, महाशिवरात्र सण त्याप्रमाणे 1 मार्चपासून 12 वी परीक्षा सुरू होणार आहे. तर 26 मार्च पासून 10 वी परीक्षा सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, पीकविमा नुकसान भरपाई मिळणे यासर्वांच्या पार्श्वभूमीवर शहरात व जिल्ह्यात शांतता राहावी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, उत्सव व  सण शांततेत पार पाडावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 15 फेब्रुवारी 2024 ते 15 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश पुर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे.


 
Top