धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल सदासुख मोदाणी (वय 80) यांचे बुधवारी 14 फेब्रुवारी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान वार्धक्यामुळे निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. येथील सह्याद्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर त्यांच्या शेतात 15 फेब्रुवारी रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात जनता बँकेचे संचालक आशिष मोदाणी, उद्योजक अमित मोदाणी, पत्नी, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात तीस शाखांच्या माध्यमातून मोठा विस्तार असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. जनता बँकेत पूर्वी सरव्यवस्थापक राहिलेले मोदाणी यांनी मागील दहा वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिला. तोट्यात असलेल्या बँकेला उर्जितावस्था देऊन बँकेला नफ्यात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता धाराशिव शहरातील बार्शी रोडवरील हातालादेवी परिसरात त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. मोदाणी यांच्या अंत्यविधीस खासदार ओमराजे निंबाळकर, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार कैलास पाटील, आमदार कैलास धस, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जि. प. चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर राज्यातील विविध भागातून आले होते. 


 
Top