धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रसिद्ध कवयित्री भाग्यश्री केसकर लिखित व मुंबई येथील ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'उन्हानं बांधलं सावलीचं घर' या काव्यसंग्रहास शनिवारी नागपूर येथील यशवंत मनोहर काव्यपुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 26 मार्च रोजी नागपूर येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यापूर्वी भाग्यश्री केसकर यांच्या काव्यसंग्रहास सात राज्यस्तरीय आणि एक अखिल भारतीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आंबेडकरी विचाराचे भाष्यकार तथा प्रख्यात साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या नावे जाहीर करण्यात आलेला हा पहिलाच पुरस्कार आहे. मनोहर यांच्या जन्मदिनी 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या काव्यापुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. संयोजन समितीच्या वतीने भाग्यश्री केसकर यांना हा महत्वपूर्ण पुरस्कार जाहीर केला असल्याचे शनिवारी कळविले.

येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात परिसेविका पदावर कार्यरत असलेल्या भाग्यश्री केसकर यांचा 'उन्हानं बांधलं सावलीचं घर' हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. यापूर्वी लातूर येथील डॉ. बाबासाहेब अकादमी, उमरगा येथील परिवर्तन संस्थेचा राज्यस्तरीय तर बडोदा येथील अखिल भारतीय अभिरुची साहित्य पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे. कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टने उल्लेखनीय ग्रंथ म्हणूनही या काव्यसंग्रहाची दखल घेतली आहे. शब्दकळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, मंगळवेढा, पद्मश्री नामदेव ढसाळ उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, मासाप राजगुरुनगर, मेघदूत साहित्य पुरस्कार, कवी कालिदास मंडळ, बार्शी आणि नारायण सुर्वे यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा साहित्य पुरस्कारही केसकर यांच्या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे. 'यशवंत मनोहर काव्यपुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल सौ. भाग्यश्री रवींद्र केसकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


 
Top