धाराशिव (प्रतिनिधी)-आदिवासी पारधी समाजाला हक्काची घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. कळंब येथील कल्पनानगर येथे आयोजित पारधी समाजबांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्रमिक मानवाधिकार सघंटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग ताटे, कळंब पेालीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.

तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकार्णी म्हणाले की, आदिवासी पारधी समाजाला गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचे काम जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम झाला असुन शेकडो युवक आज व्यवसायाकडे वळाले आहेत. ज्यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र नाही अशा आदिवासी पारधी बांधवांना शासनामार्फत कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याचे काम शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातुन युध्दपातळीवर सुरु आहे. तसेच अनेक आदिवासी युवक, युवतीना पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुटीर उद्योग याकरीता कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. या माध्यमातुन ते स्वावलंबी जीवन जगत आहेत. यापुढेही आपण आदिवासी पारधी समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरीता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पारधी वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोफत आर. ओ. प्लान्ट उभारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी केले. यावेळी आदिवासी, पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top