तुळजापूर (प्रतिनिधी)-केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका न घेता कायमस्वरुपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा सोमवार, 26 फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या शिष्टमंडळाने आज (दि.22) जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करीत आहे. सदरील निर्णय मागे न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी धाराशिव जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून आंदोलन करण्यात येत आहे.

केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सध्या केंद्र सरकारने देशातील बाजारसमित्यांच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून कारभार करण्याचा निर्णय घेत आहे. शासन नियुक्त प्रशासक मंडळ म्हणजे सात बारा नावावर असणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्त आणि निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळामध्ये असतील. या निर्णयाने बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार असून बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. देशातील बाजार समित्या या राजकारण्यांचे अड्डे बनलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र याकरिता शेतकऱ्यांचे अधिकारावर गदा आणत कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक करणे म्हणजे ढेकूण झाले म्हणून घर जाळण्यातला प्रकार आहे.

तसेच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा चालविली असून कांद्यावरील निर्यात बंदी उठविली म्हणून अनेकजणांनी जाहीरातबाजी केली. मात्र लोकसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून केंद्र सरकारने 31 मार्च पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली असल्याचे जाहीर केले आहे. व्यापारी, तस्कर व दलाल यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. यामुळे बाजार समिती व कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिनांक 26 फेब्रुवारी रोजी धाराशिव तसेच राज्यव्यापी बाजार समित्या बंदची हाक पुकारण्यात आली असून याकरिता राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात सर्व बाजार समित्यांनी तसेच माथाडी, हमाल आणि व्यापारी बांधव सहभागी होतील. अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, अभिजित साळुंके, गुरूदास भोजने, नेताजी जमदाडे, बाळासाहेब मडके यांची स्वाक्षरी आहे.


 
Top