धाराशिव (प्रतिनिधी) -अत्यंत कमी शब्दांत मोठा आशय साहित्यामधून मांडला जातो. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य अभिरुची टिकून आहे. ब्रिटिशपूर्व काळात धर्माचा, स्वातंत्र्य चळवळीला साहित्याने बळ दिले. रामायण, महाभारत, भगवदगीता हे साहित्याचा समृद्ध वारसा आहेत. संत साहित्यातून त्या त्या काळात असलेल्या अनिष्ट रूढीवर कोरडे ओढण्याचे काम झाले. ग्रामीण साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करते, असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक तथा 9 व्या मराठवाडा गरमीने साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अंजली धानोरकर यांनी केले.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठाण, किसान वाचनालय व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील पळसप येथील स्व. वसंतराव काळे साहित्य नगरीत शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी 9 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. मंचावर मावळत्या संमेलनाध्यक्ष प्राचार्य ललिता गादगे, संमेलनाच्या उदघाटक सिनेअभिनेत्री तथा साहित्यिक डॉ. निशिगंधा वाड, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, माजी मंत्री आ. महादेव जानकर, अहंमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे, प्राचार्य संजय कोरेकर, अशोक काळम, शिवाजीराव लकडे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, श्रीमती शांतामाई वसंतराव काळे, प्राचार्य सौ. शुभांगी विक्रम काळे., स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, प्राचार्य ललिता गादगे यांची भाषणे झाली. प्रारंभी स्व. वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वैभव आगळे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अनिल वसंतराव काळे यांनी केले.
उदघाटन सोहळ्यापूर्वी सकाळी पळसप गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आणि चित्र प्रदर्शन उदघाटन प्रा.डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे, पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.
पदवीधर, शिक्षकांना न्याय देण्याचे काम वसंतराव काळे यांनी केले - मंत्री संजय बनसोडे
मरठवाड्यातील पदवीधर, शिक्षकांना न्याय देण्याचे काम स्व.वसंतराव काळे यांनी केले असल्याचे विचार महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करून शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. मराठवाड्यात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना खऱ्या अर्थाने स्व.वसंतराव काळे यांनीच रुजविली असल्याचे सांगून ते म्हणाले की, स्व.वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा आमदार विक्रम काळे मोठ्या नेटाने चालवत आहेत.
ग्रामीण साहित्याने मातीशी नातं घट्ट केलं - निशिगंधा वाड
जे सहित लिहिले जाते ते म्हणजे साहित्य होय; ग्रामीण साहित्याने मातीशी नातं घट्ट रुजवले असल्याचे मत संमेलनाच्या उदघाटक निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले. ग्रामीण लोककलांचा देखील साहित्यावर मोठा प्रभाव आहे. आज साहित्यात महिला मोट्या प्रमाणात लिहित्या झाल्या आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या, विविध उदाहरणे देऊन त्यांनी साहित्याची व्याख्या स्पष्ट केली.