धाराशिव (प्रतिनिधी)-छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त येथील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने महाराष्ट्रातील सुप्रसिध्द निमंत्रित कवींचे महाकविसंमेलन आयोजित केले आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता शहरातील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे महाकविसंमेलन रंगणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कवींच्या हजेरीमुळे धाराशिवकरांना एक चांगली मेजवानी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 12 फेेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता नगरपालिकेच्या नाट्यगृहात निमंत्रितांचे महाकविसंमेलन रंगणार आहे. या कविसंमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांच्यासह डॉ. अभय शहापूरकर, दत्ता कुलकर्णी, प्रदीप मुंडे, अजित लाकाळ, बलराज रणदिवे, संतोष हंबीरे, रवींद्र केसकर, राहुल कुलकर्णी, अमरसिंह देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे.
माजी आमदार तथा प्रख्यात साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बहारदार कविसंमेलनात प्रशांत मोरे (मुंबई), नितीन देशमुख (अमरावती), नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर), भाग्यश्री केसकर (धाराशिव), विजय देशमुख (तुळजापूर), अविनाश भारती (माजलगाव), इंदजित घुले (मंगळवेढा), भरत दौंडकर (पुणे), निलेश चव्हाण (छत्रपती संभाजीनगर), आबा पाटील (कर्नाटक) आणि डॉ. स्वप्नील चौधरी (पुणे) हे नामवंत कवी सहभागी होणार आहेत. सर्वांसाठी हे कविसंमेलन निशुल्क असणार आहे. या कविसंमेलनास धाराशिव शहर आणि परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे, उपाध्यक्ष गौरव बागल, सचिव आकाश कोकाटे, शहराध्यक्ष मंगेश निंबाळकर, तालुकाप्रमुख अमोल शिरसट यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.