धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप परिसर धाराशिव चे विशेष वार्षिक श्रम संस्कार शिबिर हे खेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा चौथा दिवस (दि. 9 फेब्रुवारी ), या चौथ्या दिवसाची सुरुवात ही श्रमदानाने करण्यात आली. शिबिरार्थीनी गावातील शाळेमध्ये स्वच्छता केली, तसेच आरओ वॉटर फिल्टर मधून बाहेर पडत असलेल्या पाण्याला झाडांकडे वळवण्यासाठी, वाट तयार केली. सदर स्वच्छतेच्या कामामध्ये शाळेतील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी मदत केली. 

 दुसऱ्या सत्रात, डॉ. गोविंद कोकणे, सहयोगी प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव  यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना “बालविवाह प्रतिबंध“ या  विषयावर मार्गदर्शन केले. बालविवाह होणे हि प्रथा सामाजिक विकासातील अडसर आहे. शाश्वत विकासात महिलांना सामाजिक, आर्थिक, व राजकीय क्षेत्रात प्रगतीची संधी उपलब्ध झाली पाहिजे. बालविवाह झाला कि मुली शिक्षणापासून वंचित राहतात. समज येण्या अगोदर त्यांच्यावर सांसारिक जबाबदार येते. मुलभूत मानवी अधिकार त्यांना शिक्षण अभावी मिळत नाहीत. शाश्वत विकासाचे ध्येय साकार करण्यासाठी मुलींना शिक्षण व विकास प्रक्रियेत योग्य संधी मिळणे आवश्यक असल्याचे  प्रतिपादन  त्यांनी आपल्या व्याख्यानात  केले. डॉ. गोविंद कोकणे म्हणाले की निरक्षरता, अज्ञान, गरिबी, आणि बेरोजगारी हे देशासमोरील मुलभूत प्रश्न आहेत. शैक्षणिक, शारीरिक,मानसिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय विकास समानतेच्या तत्वावर झाल्यास जागतिक शाश्वत विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. युवकांमध्ये सामाजिक निर्माण झाल्यास अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत होईल. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करित असतांना त्यांनी असे मत व्यक्त केले. सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे यांनी स्वावलंबनाचे महत्व विषद केले. शिक्षणांतून विद्यार्थ्यांमधे स्वावलंबन भावना वाढीस लागते. आपल्या हक्क व कर्तव्यात व्यक्ती जबाबदार बनतो. आर्थिक स्वावलंबन हे व्यक्ती विकास व प्रतिष्ठित जीवनासाठी आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. जितेंद्र शिंदे यांनी भूषविले. त्यांनी म्हटले की, आपल्याच सभोवताली बालविवाह सारख्या अनिष्ट घटना घडत असतील, तर आपण विरोध केला पाहिजे. अशिक्षित पालकांचे प्रबोधन केले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली सामाजिक जाणीव हा प्रगतीचा मूलाधार आहे. सर्व समाजघटकांमध्ये असणारे अनिष्ट प्रथा,परंपरा नष्ट करणे शिक्षणातून शक्य होईल. रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मेघशाम पाटिल यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन शेख यांनी केले. आदित्य काटकर यांनी आभार मानले. 

तिसऱ्या सत्रामध्ये ग्रामपंचायत परिसरामध्ये उत्तरदायित्व या नाटकाचा प्रयोग गावाकऱ्यांसाठी करण्यात आला. हे नाटक नाट्यशास्त्र विभाग, विद्यापीठ उप-परिसर येथील विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर नाटिका ही खेड्यातील सत्य परिस्थिती दर्शविणारी होती. आपल्यालाच आपलें उत्तरदायित्व घ्यावे लागते असा नाटीकेचा सार होता. नाटकाला गावातील नागरिक मोठयासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला, गावातील जेष्ठ नागरिक श्री. नामदेवराव गरड व इसुफ शेख आणि नाट्यशास्त्र विभागाचे डॉ. गणेश शिंदे यांचे नॅपकिन बुके व नारळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, नाटकातील सर्व कलाकारांचा सत्कार सरपंच श्री. सुनील गरड यांच्या हस्ते करण्यात आला. समीर विरुटकर लिखित व डॉ. गणेश शिंदे दिग्दर्शीत या नाटीकेमध्ये ओंकार वट्टे, डॉ. उषा कांबळे, समाधान, वैष्णवी भागवंत यांनी भूमिका उत्कृष्टपणे सादर केल्या. नाटकाचे नैपथ्य विशाल रणदिवे, प्रकाशनियोजन दिनेश पाटोडे, संगीत योगेश घाडगे यांनी केले.


 
Top