कळंब (प्रतिनिधी)- शेतातल्या रस्त्याच्या वादातून चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारून पुतण्या फरार झाल्याची थरकाप उडवणारी घटना कळंब तालुक्यातील शिराढोण येथे घडली असून, पोलिसांनी पुतण्याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार गुरूवारी दुपारी घडला, शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

येथील दोन चुलत भावात शेताच्या रस्त्याचा वाद सुरू होता. या वादावरून गुरुवारी सकाळी शिलाबाई परमेश्वर यादव (40) या महिलेस तिच्या पुतण्याने घराकडे जात असताना ट्रॅक्टरखाली चिरडले. परमेश्वर गोविंद यादव व बालाजी विठ्ठल यादव या दोन चुलत भावात शेतात जाण्याच्या रस्त्यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. या रस्त्याच्या वादात दोन कुटुंबांमध्ये कांही महिन्यांपूर्वी हाणामारी झाली होती. या हाणामारीत तीक्ष्ण हत्याराचा वापर झाला होता. त्यावेळी दोन्हींकडील काही लोक गंभीर जखमी झाले होते. त्याच घटनेचा राग मनात धरून गुरूवारी सकाळी दहा वाजता घराकडे जाताना शिलाबाई परमेश्वर यादव या महिलेस चुलत पुतण्या समाधान बाळासाहेब यादव याने ट्रॅक्टरखाली घेवून चिरडले. दोन ते तीन वेळा ट्रॅक्टरखाली घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर महिलेस तातडीने अंबेजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न चालू होतो. परंतु त्या पुर्वीच महिलेचे निधन झाले.

आरोपी समाधान याने घटनास्थळापासून फरार झाला होता. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, शिराढोण येथील सहाय्यक पोलीस कल्याण नेहरकर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, परमेश्वर पवार, इतर पोलीस कर्मचारी तसेच धाराशिव येथील फॉरेन्सीक टीम यांनी तपास कार्य सुरु केले. रात्री उशीरा सपोनि नेहरकर यांनी व त्यांच्या टिमने फरार आरोपी समाधान यास अटक केली. महिलेचे पती परमेश्वर गोविंद यादव यांनी रात्री उशीरा दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी समाधान बालाजी यादव याच्यावर कलम 302 भादविप्रमाणे गुन्हा नेांद करण्यात आला. शुक्रवारी आरोपीला कळंब येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


 
Top