तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले वैभव प्रभाकर लेणेकर यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कृषी सेवारत्न पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे.                               

वैभव लेणेकर हे मागील पंधरा वर्षापासून धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यापर्यंत कृषी विषयक विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचवण्याचे काम करत आहेत. महिला शेती शाळेचा अभिनव उपक्रम त्यांनी मौजे वानेवाडी, हिंगळजवाडी व किणी या गावात राबवून महिला शेतकऱ्यांपर्यंत विविध पिकांचे ज्ञान पोचविण्याचे व महिलांना सक्षम व निर्णयक्षम बनविण्याचे काम केले.सोयाबीन पिकाच्या बीबीएफ व  टोकन पद्धतीचा प्रचार प्रसार करून 1000 एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करून घेतली त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडली. मौजे  वानेवाडी व बालपिरवाडी गावातील शेतकऱ्यांची शंभर टक्के ईपीक पाहणी केली यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. सोयाबीन घरगुती बियाणे वापराबाबत घरोघर जाऊन जनजागृती करणे, सोयाबीन पिकाचे तंत्रज्ञान विविध शेतीशाळा, प्रशिक्षण व रेडिओ टॉकच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्यामुळे तत्कालीन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. या विविध नाविन्यपूर्ण  उपक्रमातून त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत दिला जाणारा  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कृषी सेवारत्न हा  पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना विभागीय कृषी सहसंचालक  साहेबराव दिवेकर, विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  महेश कुमार तीर्थकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  रविंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी  महादेव आसलकर ,तालुका कृषी अधिकारी  संजय जाधव, तंत्र अधिकारी  दीपक दहिफळे यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top