धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सर्वे क्र. 239 व 240 मधील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन रामचंद्र दगडू बांगड यांनी विनापरवाना व्यापारी गाळे तयार केलेले आहेत. या प्रकरणात नगर परिषद प्रशासनाने आदेश दिल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे अन्यथा 21 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी भारत वगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगरे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव नगर परिषद हद्दीतील सर्वे नं. 239 व 240 या सरकारी जमीनीवर अतिक्रमण केलेल्या रामचंद्र दगडू बांगड यांना तहसील कार्यालयाने नोटीस दिल्यानंतरही ते विनापरवाना कमर्शिअल बांधकाम करत असून सदरील बाबतीत नगर परिषद प्रशासन अतिक्रमण हटविण्याच्या तयारीत नाही. तसेच नगर परिषद धाराशिव यांचे मार्फत देखील कोणतीही ठोस कार्यवाही अतिक्रमण हटविणेबाबत करण्यात येत नाही. त्यामुळे सर्वे नं. 239 व 240 या सरकारी जमीनीवरील रामचंद्र दगडू बांगड यांनी केलेले बांधकाम हटविणेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करणेबाबत संबंधीतास आदेशित करण्यात यावे व सदरील अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने 21 फेब्रुवारी 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.