भूम (प्रतिनिधी)- सध्या भूम तालुक्यात जिल्हा परिषद शाळेची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. भूम तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 117 जिल्हा परिषद शाळा चालवल्या जातात. या शाळेत शिकणारे सर्व गोरगरीब घरातील विद्यार्थी असून  ते जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात. पण सध्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री  आमदार तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघातच जिल्हा परिषद शाळांना शिक्षक मिळेना अशी परिस्थिती झाली आहे. 117 शाळेंपैकी 64 जागा रिक्त असून या जागे संदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवूनही अद्याप शिक्षक दिलेले नाहीत. तसेच तालुक्यातील 4 शाळा नळी, घुलेवाडी,गिरल गाव, यमाई वस्ती येथे एकही शिक्षक नाही. पर्यायी शिक्षक पाठवून त्यांना शिकवले जात आहे. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने जीआर काढून सेवानिवृत्त शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत शिकवण्यासाठी मानधन दिले जाईल असा प्रस्ताव केला होता त्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांनी निवृत्त शिक्षकांचे प्रस्ताव पाठवले आहेत त्यावरही काही कारवाई झालेली नाही. रोज कोणत्या ना कोणत्या गावातून नागरिक या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात येत असतात देवांग्रा शाळेतील ही अशीच परिस्थिती असून एका शिक्षकावर जिल्हा परिषद शाळेचे सर्व वर्ग चालवले जातात याबाबतीत गटशिक्षण अधिकारी यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही शिक्षक देऊ शकत नाही 64 शिक्षकांची जागा रिक्त असून त्याबाबतीत आम्ही मागणी केलेली आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून त्याच गावातील कुणी सुशिक्षित विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शाळेवर शिकवले तर त्याला मानधन न देता आम्ही एखादे प्रमाणपत्र देऊ शकतो  असे त्यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबतीत शासन गंभीर नसून जिल्हा परिषद शाळेची अशी गंभीर अवस्था असताना देखील  राजकीय इच्छाशक्ती याबाबतीत दिसून येत नाही. तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयात एकूण

0 9 केंद्रप्रमुख केवळ एक केंद्रप्रमुख असून0 8 जागा रिक्त आहेत. तसेच लिपिकाच्या 02 जागा असून 01 रिक्त आहे. व विस्तार अधिकाऱ्यांच्या 05 जागा असून त्यातील 01 रिक्त आहे. याबाबतीत धाराशिव जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे कारण जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे. याबाबतीत तात्काळ शिक्षकांची नेमणूक करून दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. सावंत यांनी तात्काळ निर्देश दिले पाहिजेत व जिल्हा परिषद शाळेतील रिक्त जागा भरण्याबाबत सूचना केल्या पाहिजेत. पालकमंत्र्याच्या मतदारसंघातच जर जिल्हा परिषद शाळेची ही अवस्था असेल तर धाराशिव जिल्ह्यात काय परिस्थिती असू शकते याची कल्पना न केलेली बरी अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.


 
Top