नळदुर्ग (प्रतिनिधी)- अणदुर ते उमरगा पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुचे काम पुर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, टोल नाका परीसरातील 20 किमी अंतरावरील गावांतील कुठल्याही वाहनांना टोल घेऊ नये यासह अनेक मागण्यांसाठी दि.7 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आदेशानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तुळजापुर तालुक्यातील फुलवाडी टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापुर यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षांपासुन या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडत पडले आहे. या अर्धवट कामामुळे नळदुर्ग परीसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये शेकडो नागरीकांचा मृत्यु झाला आहे. एक वर्षापुर्वी शिवसेनेच्या वतीने 24 दिवस या टोलनाक्यावर टोल वसुली बंद करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाने सदरील काम 12 जुलै 2023 पुर्ण करण्यात येईल असा शब्द खासदारांना देण्यात आला होता. त्याचबरोबर हे काम एससटीपीएल कंपनीकडुन काढुन घेऊन हे काम टीएमपीएल कंपनीला देण्यात आले होते. मात्र टीएमपीएल कंपनी काम करण्यास आज असमर्थ ठरली आहे. त्यामुळे टीएमपीएल कंपनीकडुन हे काम काढुन घ्यावे. कंपनीकडुन हे काम काढुन घेतले नाही  तर टीएमपीएल कंपनीला आम्ही काम करू देणार नाही. त्याचबरोबर टोल नाका परीसरातील 20 किमी. अंतरावरील गावांतील कुठल्याही वाहनास टोल आकारू नये. अणदुर ते उमरगा या अंतरावरील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुचे काम पुर्ण झाल्याशिवाय एक रुपयाही टोल वसुल करू नये. टोलनाका पुर्णपणे बंद ठेवावे असे या निवेदनात म्हटले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आदेशानुसार दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. फुलवाडी टोलनाक्यावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टोल नाका बंद करो आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांची स्वाक्षरी असुन निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, तहसिलदार तुळजापुर व सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे नळदुर्ग यांना देण्यात आले आहे.


 
Top