नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यातून आसपासच्या 20 किलोमिटर अंतरावर असलेल्या गावातील चार चाकी वाहनांना टोलमाफी करण्यात यावी या मागणीसाठी नळदुर्ग शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. दरम्यान संबंधित विभागाने यावर येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आले असल्याचे शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांनी सांगितले आहे .

फुलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहन धारकाकडून टोल वसूल केला जात आहे, मात्र रस्त्याचे काम अर्धवट राहिले असताना टोल वसूल करणे चुकीचे आसताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून टोल वसूल केला जातो, त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आदेशाने येथील शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वात  टोलनाक्यावर दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी चव्हाण बोलताना म्हणाले की, महामार्ग प्राधिकरण विभागाने जो पर्यंत रस्त्याची रखडलेली कामे पूर्ण करीत नाहीत तो पर्यंत टोल घेणे बंद करावे. त्याशिवाय टोल नाक्याच्या 20 किलोमिटर परिसरातील वाहन धारकांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगण्याप्रमाणे टोल मुक्ती करावी अन्यथा या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान या नंतर सर्व वाहने मोफत सोडण्यात आली. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे कांही अधिकारी उपस्थित होते. दरम्यान आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम राहिल्याने या प्रश्नावर दिन. 9 फेब्रुवारीला एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्र संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याने हे आंदोलन थांबविण्यात आले असल्याचे कमलाकर चव्हाण यांनी सांगितले. यावेळी डॉ. जितेंद्र कानडे, सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, बशीर शेख यांची ही भाषणे झाली. यावेळी शेकडो शिवसैनिक त्यांच्या बरोबर वाहन मालक, चालक, सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी टोलनाक्यांवर सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


 
Top