धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्त वतीने 17 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “ शिवगर्जना “ या महानाट्याचे आयोजन पोलीस परेड ग्राउंड,धाराशिव येथे सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे.     

“शिवगर्जना “ महानाट्याच्या आयोजनाच्या अनुषंगाने आज 8 फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेला उपजिल्हाधिकारी श्री. भोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री. जोगदंड,सार्वजनिक बांधकाम ( विद्युत) उपअभियंता श्रीमती घोरपडे, डॉ.आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील नाट्य विभागाच्या प्रा.डॉ. उषा कांबळे, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री.पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे,साहित्यिक युवराज नळे, केतन पुरी, शिवगर्जना महानाट्याचे निर्माता दिग्दर्शक स्वप्निल यादव, सहयोगी दिग्दर्शक शकील पटेल व व्यवस्थापक सम्येध मुधाळे उपस्थित होते.

“शिवगर्जना “ महानाट्याची प्रेक्षक क्षमता 8 ते 10 हजार इतकी आहे. फिरता 65 फुटी भव्य रंगमंचावर 300 कलावंत हे महानाट्य सादर करणार आहे. यामध्ये हत्ती, घोडे,उंट व बैलगाडी देखील असणार आहे.या महानाट्यामध्ये चित्तथरारक लढाया, रोमांचकारी प्रसंग,एक धगधगत्या इतिहासाची आठवण, नेत्र सुखद अतीषबाजी, खराखुरा निखळ इतिहास,मंत्रमुग्ध संगीत, नेत्रदीपक प्रकाश योजना,आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड घातलेली पाहायला मिळणार आहे.

या महानाट्यमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजी राजाची हत्या, शिवजन्म,युद्ध कला व राज्यकारभाराचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, पन्हाळगड वेढा,पावनखिंडीतील शौर्यगाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लूट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरेचे बलिदान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हे प्रसंग या महानाट्यातून बघायला मिळणार आहे.


 
Top